पर्यटन आणि तिर्थस्थळं

  • पंढरपुर – Pandharpur

पंढरीचा विठोबा आणि त्याचे वारकरी यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हें तर अवघ्या त्रिभुवनात पंढरपुर सुपरिचीत आहे.  जाती भेदाच्या पलिकडच्या या भगवंताला भेटण्याकरता लांबलांबुन वारकरी पायी पायी विठुरायाच्या भेटीला आषाढी वारीला येत असतात.

अलौकीक असा हा वारीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याकरता देखील लाखो भाविक पंढरीला येत असतात. विÐल आणि रूक्मीणीच्या दर्शनाकरता वारकरी तासनतास् रांगेत उभे असतात.

आषाढी आणि कार्तिकी अश्या दोन उत्सवादरम्यान पंढरपुरात प्रचंड संख्येने भाविक दाखल होतात.

चंद्रभागेच्या तिरावर वसलेले हे मंदीर फारच प्राचीन असुन अगदी गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत या ठिकाणी एकसमान होतात.

या पंढरपुरात शेगावच्या गजानन महाराजांचे देखील मंदिर असुन तो परिसर देखील दर्शनाकरता आणि निवासाकरता अतिशय योग्य आहे त्यामुळे विठोबाच्या मंदिरात दर्शनाला आलेले भाविक या ठिकाणी देखील दर्शनाकरता येतात.

सोलापुर जिल्हयातील पंढरपुर हे ठिकाण रेल्वे, बस आणि खाजगी वाहनांने देखील जोडले असुन सोलापुर पासुन अवघ्या दिड तासाच्या अंतरावर आहे.

  • गाणगापुर – Gangapur

दत्तात्रयाचे नृसिंह सरस्वती अवतारातील हे गाणगापुर ठिकाण अत्यंत पवित्र आणि धार्मिक स्थळ म्हणुन प्रसिध्द आहे.

सोलापुर पासुन साधारण तीन तासाच्या अंतरावर 110 कि.मी. वर असलेल्या या ठिकाणी दत्तभक्त दर्शनाकरता येतातच.

येथील भिमा अमरजा संगमावर सकाळी स्नान करून दुपारच्या वेळेस पाच घरी भिक्षा मागावी आणि सायंकाळी दत्तात्रयाच्या पादुकांचे दर्शन घ्यावे असे केल्याने प्रभु दत्तात्रयाची कृपादृष्टी प्राप्त होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.

दत्तात्रय प्रभु या ठिकाणी नृसिंह स्वरूपात अस्तित्वात असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

भिमा अमरजा अश्या पवित्र नद्यांचा या ठिकाणी संगम आहे.

  • अक्कलकोट – Akkalkot

सोलापुर पासुन अगदी जवळ म्हणजे 40 कि.मी. अंतरावर असलेले अक्कलकोट हे ठिकाण स्वामी समर्थामुळे सर्वदुर परिचीत आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या अगदी लगत हे गाव दत्तपरंपरेतील भाविकांकरता अत्यंत पवित्र ठिकाण आहे.

एकदा एका भक्ताने समर्थांना त्यांच्या विषयी विचारले असता समर्थांनी सांगितले की ते औदंुबराच्या वृक्षातुन निघालेले आहेत आणि एकदा असे सांगितले की त्यांचे नाव नृसिंह भान असुन श्रीशैलम नजीक कर्दळीवनातुन ते आले आहेत.

आजही कर्दळीवनाची यात्रा करणा.या भाविकांना त्याठिकाणी स्वामी समर्थांचे स्थान पहावयास मिळते.

संपुर्ण भारतात पदभ्रमंती केल्यानंतर श्री स्वामी समर्थ शेवटी अक्क्लकोट या ठिकाणी आले त्यामुळे त्यांचे हे ठिकाण अत्यंत पवित्र आणि जागृत असुन भाविक या ठिकाणी नेहमी दर्शनाकरता येत असतात.

  • सिध्देश्वर मंदिर – Siddheshwar Temple

सिध्देश्वर हे सोलापुर नगरीचे ग्रामदैवत असुन या मंदिराची निर्मीती योगी श्री सिध्दरामेश्वर यांनी केली आहे जवळजवळ 68 शिवलिंगांची त्यांनी स्थापना केली.

सोलापुरचे सिध्देश्वर मंदिर फार प्राचीन मंदिर असुन अनेक शिवलिंगांचे दर्शन या ठिकाणी भाविकांना घेता येते.

श्री गणेशाची मुर्ती देखील या ठिकाणी असुन येथील मुर्तींवर आणि मंदिरावर कर्नाटकी स्थापत्य कलेचा प्रभाव आपल्याला दिसुन येतो.

श्री शिव सिध्दरामेश्वरांची समाधी या ठिकाणी असुन तेथील शिवपिंडीवर सदैव जलाभिषेक सुरू असतो.

या मंदिराच्या सभोवताली सिध्देश्वर तलाव असुन हे मंदिर सदैव पाण्याने वेढलेले असते मंदिर परिसरातुन सोलापुरचा किल्ला दृष्टीस पडतो.

येथील सिध्देश्वराची यात्रा फार प्रसिध्द असुन त्या दरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात.

या व्यतिरीक्त सोलापुर जिल्हयात अशी बरीच ठिकाणं आहेत ज्याला आपण आवर्जुन भेट द्यायला हवी.

त्यापैकी नान्नजचे माळढोक अभयारण्य, बार्शी चे हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील भगवान विष्णुचे मंदिर, दक्षिण सोलापुर तालुक्यातील हत्तरसंग कुडल या ठिकाणी भीमा आणि सीना नदीचा संगम झालेला आपल्याला पहायला मिळतो या संगमावर हरिहरेश्वर आणि संगमेश्वर अशी महादेवाची मंदिर आपल्याला आकर्षीत करतात.

करमाळा येथील प्रसिध्द भुईकोट किल्ला सुध्दा प्रेक्षणीय आहे.

त्याचप्रमाणे सोलापुरमधल्या कंबर तलावानजिक असलेले महात्मा गांधी प्राणी संग्रहालया सारखी बरीच ठिकाणं आपल्याला सोलापुरात पहायला मिळतात.

महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्हयात असली तरी सोलापुर पासुन ती अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *